भारत मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली बारा वर्षांत आत्मनिर्भर

भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी मांडला लेखाजोखा

पी.वी.आनंदपद्मनाभन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारा वर्षांत प्रत्येक क्षेत्राला देशाला दिशा देण्याचे काम करीत देशाला आत्मनिर्भर बनवण्याचे काम केले. त्यामुळे पूर्वी अनेक बाबतीत अन्य देशांवर अवलंबून असणारा भारत देश प्रत्येक क्षेत्रात स्वयंपूर्ण होत असल्याचे प्रतिपादन करीत भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी मोदी सरकारच्या बारा वर्षांच्या कामगिरीचा व्यापक आढावा घेतला. ठाणे येथे शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष केशव उपाध्ये, प्रदेश सरचिटणीस आ. निरंजन डावखरे, आ. संजय केळकर, ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संदीप लेले उपस्थित होते.
महाविकास आघाडीचे सरकार हे गरिबी हटाव असे म्हणायचे. प्रत्यक्षात त्यांनी त्याबाबत काय केले हे सगळ्यांना ठाऊक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने 25 कोटीपेक्षा अधिक जनतेला गरिबी रेषेबाहेर काढण्याचे काम केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 80 कोटीपेक्षा अधिक जनतेला दोन्ही वेळेचे अन्न मिळाले पाहिजे म्हणून अन्न सुरक्षा योजनेच्या माध्यमातून मोफत धान्य देण्याचे काम केले. पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गरिबाला स्वतःचे हक्काचे घर मिळाले पाहिजे हे उद्दिष्ट ठेवले.

देशहिताच्या दृष्टिकोनातून देशाच्या सीमा सुरक्षित राहिल्या पाहिजेत अशी चर्चा पूर्वीही यूपीए सरकारमध्ये होत होती. परंतु त्यादृष्टीने एकही पाऊल त्या सरकारने उचलले नव्हते. 2014 मध्ये देशहित जपणारे मोदी सरकार सत्तेत आले तेव्हापासून त्यासाठी आवश्यक ते निर्णय घेण्यात आले. संरक्षण सामग्रीसाठी पूर्वी आपल्याला वेगवेगळ्या महासत्ता असणाऱ्या देशांवर अवलंबून राहावे लागत होते. परंतु आता संरक्षण क्षेत्रामध्ये निर्यात करणारा सर्वात मोठा देश म्हणून भारत पुढे येत असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.
कोरोना काळात फक्त आपल्या देशातच मोफत लसीकरण करण्याचेच काम नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातल्या सरकारने केले नाही तर जगाच्या पाठीवरच्या इतरही अनेक देशांना मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध करून देण्याचे काम केले. वन नेशन वन ग्रीड या उद्दिष्टातून वीजनिर्मिती करत 2014 पूर्वी असणारी विजेची टंचाई आणि लोड शेडिंगचा प्रश्न निकाली काढला. अपारंपारिक ऊर्जा, सौर ऊर्जा, इंधनासाठी लागणारे परकीय चलन या सगळ्याचा विचार करून आवश्यक पावले उचलली. परिणामी उद्योगासाठीची तसेच घरगुती वापराची वीज आता मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याकडे लक्ष वेधत चव्हाण यांनी मोदी सरकारच्या बारा वर्षांतील अनेक योजनांचा आढावा घेतला.
चव्हाण पुढे म्हणाले, देशातील प्रत्येक नागरिकाला डोळ्यासमोर ठेवून शेवटच्या व्यक्तीपर्यंत सरकारी योजना पोहोचल्या पाहिजेत या दृष्टीकोनातून अहोरात्र आणि सातत्याने काम करीत पंतप्रधान मोदी यांनी देशाची अर्थव्यवस्था चौथ्या स्थानावर नेण्याचे काम केले. लवकरच ती तिसऱ्या क्रमांकावर जाणार असल्याचा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली वाटचाल सुरु असून 2047 पर्यंत विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र ही भूमिका घोडदौड सुरु आहे. या सगळ्यात महाराष्ट्रातील 14 कोटी जनतेची भूमिका ही सर्वात मोठी असणार आहे. कारण आपला महाराष्ट्र हा ग्रोथ इंजिन म्हणून काम करत असल्याने महाराष्ट्राचा त्यातील वाटा हा सर्वात मोठा आहे देवेंद्रजींच्या नेतृत्वात महाराष्ट्र हा सातत्याने या दिशेने जाताना आपण प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर असले पाहिजे या दृष्टीकोनातून त्यांचा प्रयत्न असल्याचे चव्हाण यांनी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *