

पी.वी.आनंदपद्मनाभन
कल्याण
कल्याण डोंबिवलीत ठिकठिकाणी, विशेषतः डांबरी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची प्रशासनाने गांभिर्याने दखल घेतली असून हे खड्डे भरण्याचे काम युद्धपातळीवर केले जाणार असल्याची माहिती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शहर अभियंता अनिता परदेशी यांनी दिली आहे. तसेच कल्याण डोंबिवलीतील सर्वच रस्ते टप्प्याटप्याने सिमेंट काँक्रीटचे करण्याचे काम सुरू असून तोपर्यंत नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
यंदा चक्क 10 मे पासूनच पावसाला सुरूवात झाली आहे. त्यातच गेल्या आठवड्याभरापासून किंवा त्याहीपेक्षा अधिक दिवसांपासून कल्याण डोंबिवलीमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. परिणामी सिमेंट काँक्रीटीकरण न झालेल्या डांबरी रस्त्यांवर काही प्रमाणात खड्डे पडले असून त्याचा नागरिकांनाही मोठा त्रास होत आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शहर अभियंता अनिता परदेशी यांनी शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची वस्तुस्थिती मान्य केली. या डांबरी रस्त्यांवरील खड्ड्यांची महापालिका प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून या रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम वेगाने केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले . सध्या पावसाचा जोर वाढलेला असल्याने रस्त्यांवर पडलेले हे खड्डे भरण्यासाठी कोल्ड मिक्स, स्टोन क्रश आदी पद्धत वापरण्यात येत असून ही दुरुस्ती तात्पुरत्या स्वरूपात केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
सर्वच रस्ते सिमेंट काँक्रीटीकरण करण्याच्या दिशेने वाटचाल…
दरम्यान कल्याण डोंबिवली शहरातील सर्वच प्रमुख रस्ते हे सिमेंट काँक्रीटचे केले जाणार असून त्यापैकी काही रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. तर काही रस्त्यांची कामे अंतिम टप्प्यात आली असल्याचे सांगत येत्या काळात टप्प्याटप्प्याने सर्वच रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहनही शहर अभियंता अनिता परदेशी यांनी केले आहे.