


पी.वी.आनंदपद्मनाभन
मीरा भाईंदर :- मीरा भाईंदर येथे नवीन दिवाणी न्यायालय तयार झाल्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, यापुढे न्याय मिळवण्यासाठी ठाण्यापर्यंत पायपीट करावी लागणार नाही असे उद्गार उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. जागतिक महिला दिनाच्या मुहूर्तावर न्यायदेवतेची प्रतिष्ठापना करण्याचे सौभाग्य लाभले असून या न्यायालयाचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना नक्की होईल असा विश्वास यावेळी बोलताना त्यांनी व्यक्त केला. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या प्रमुख उपस्थितीत आज या न्यायालयाच्या नूतन इमारतीचे कोनशीला अनावरण करण्यात आले.
यावेळी बोलताना, मीरा भाईंदर मध्ये बार कौन्सिल होते मात्र न्यायालय नव्हते. त्यामुळे इथे न्यायालय असावे अशी मागणी गेली अनेक वर्षे पुढे येत होती. न्यायमूर्ती अभय ओक हे ठाणेकर आहेत त्यामुळे सध्या ठाणेकर म्हणतात तसेच होत आहे. त्यांनी इथे उद्घाटनासाठी यायला होकार दिला त्यामुळे हे न्यायालय देखील न्यायमंदिर झाल्याशिवाय राहणार नाही असे मत व्यक्त केले. या न्यायालयाचे काम व्हावे यासाठी सर्वच लोकप्रतिनिधीनी प्रयत्न केले. त्यामुळे आता एक स्वप्न पूर्ण झाले असून या न्यायालयाच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला न्याय मिळेल याबद्दल आनंद आणि समाधान व्यक्त केले. या न्यायालयाच्या कामात अनेक विघ्नही आली, मात्र अखेर हे न्यायालय बांधून पूर्ण झाले आहे. मात्र या न्यायालयाला अधिक जागेची गरज असल्याचे मला समजले. त्यामुळे न्यायालयाचा विस्तार करण्यासाठी त्याना लागेल तेवढी जमीन देण्याचे निर्देश शिंदे यांनी यावेळी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना दिले. तसेच ठाणे शहरातील नवीन न्यायालयाची इमारत बांधून पूर्ण झाली असून तिच्या उद्घाटनासाठीही वेळ द्यावा अशी विनंती न्यायमूर्ती अभय ओक याना केली.
मीरा भाईंदर शहराची लोकसंख्या ही गेल्या काही वर्षात झपाट्याने वाढली आहे. वर्षभरात इथे मेट्रो धावू लागेल. त्यामुळे लोकल गाडीतून मरणयातना झेलत प्रवास करण्यातून नागरिकांची मुक्तता होईल. त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होईल. ठाणे, मीरा- भाईंदर आणि कुर्ला- बिकेसी दरम्यान लोकांना अधिक गतीने प्रवास करता यावा यासाठी आम्ही पॉड टेकसी प्रकल्प करणार असल्याचेही यावेळी सांगितले.
अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात 32 नवीन न्यायालयाना मान्यता दिली, 14 अतिरिक्त सत्र न्यायालये मंजूर केली, अकराशे पदे त्रयस्थ नेमणुकीने भरली तर 2 हजार 863 पदे भरल्याचे सांगितले. मंत्रिमंडळ बैठकीत न्यायालयाबाबतचा कोणताही विषय आला तर आम्ही तो पाच मिनिटात तत्काळ मंजूर करून टाकतो असेही शिंदे यांनी आवर्जून सांगितले. या नवीन न्यायालयाने फिर्यादीला ठाण्यापर्यंत हेलपाटे न मारता इथेच न्याय मिळेल त्यामुळे प्रत्येकाच्या पदरात न्याय पडेल असे सांगितले. राज्य शासन हे लोकांसाठी कटिबद्ध असून त्यामुळे शासन आपल्या दारी हा उपक्रम राबवून आम्ही 5 कोटी लोकांना विविध शासकीय योजनांचे थेट लाभ मिळवून दिले होते. आता न्याय लोकांच्या दारी मिळणार असून त्याचा फायदा त्याना नक्की होईल असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.
तर न्यायालयाच्या अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्यासाठी मीरा भाईंदर येथे हे नवीन न्यायालय सुरू करायला मंजुरी दिली असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी व्यक्त केले. ठाणे हा एकमेव असा जिल्हा आहे की ज्यात सात महानगरपालिका आहेत. त्यामुळे मीरा-भाईंदर येथे महानगरपालिका असल्याने तालुका वेगळा नसूनही येथे दिवाणी न्यायालय सुरू करायला मंजुरी दिली असल्याचे सांगितले. शिंदे यांनी न्यायालयाच्या कामाला शासन कायमच प्राधान्य देते असे सांगितले, आमचे प्रस्ताव तत्काळ मंजूर होतात असेही सांगितले. गेल्या दोन-अडीच वर्षात हा बदल झाल्याचे माझ्या सहकाऱ्यांनी मला सांगितले असून हा बदल नक्कीच सकारात्मक आहे असे मत ओक यांनी व्यक्त केले. सध्या मीरा भाईंदर न्यायालयात एकच न्यायाधीशाची नियुक्ती केलेली असली तरीही भविष्यात या न्यायालयाचे विस्तारीकरण करून 5 ते 6 न्यायाधीशांची नेमणूक येथे करण्यात येईल. या न्यायालयात मिळणाऱ्या न्यायचा दर्जा या चांगला असायला हवा, सर्वसामान्य माणसापर्यंत तो न्याय पोहचायला हवा अशी अपेक्षा ओक यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.
यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अलोक आराधे, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश गिरीश कुलकर्णी, न्यायाधीश गौरी गोडसे, ठाणे कोर्टाचे मुख्य न्यायाधीश श्रीनिवास अग्रवाल, मीरा भाईंदर कोर्टाचे दिवाणी न्यायाधीश एस. एच. जाधव, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे सदस्य सुदीप पासबोला, बार असोसिएशनचे अध्यक्ष डी. जी. नाईक, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार नरेंद्र महेता, माजी आमदार गीता जैन, गिलबर्ट मेंडोसा, मीरा भाईंदर मनपा आयुक्त राधाविनोद शर्मा, ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
https://www.instagram.com/reel/DFHv4rcoAbG/?igsh=MWtrM3JxNjJ6N2U5dw==





