

पी.वी.आनंदपद्मनाभन
98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलन म्हणजे मराठी भाषेचा हा महाकुंभ असून मराठी भाषेतील सर्व प्रवाहांचा हा संगम आहे. या संगमात गेले तीन दिवस साहित्यस्नान घालून आपण सगळे पवित्र झालो आहोत. त्यामुळे महाकुंभातून परत जाताना जसे आपण गंगेचे पाणी सोबत घेऊन जातो तसेच या संमेलनातून परतताना आपण मराठी भाषेचा संवर्धनाचा वसा सोबत घेऊन जाऊया अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. साहित्य संमेलनाच्या समारोप सोहळा आज तालकटोरा स्टेडियममध्ये पार पडला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, संमेलनाच्या अध्यक्षा ताराबाई भवाळकर, मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत, बी.डी पाटील, विजय दर्डाजी, मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषाताई तांबे, उज्ज्वलाताई मेहेंदळे, प्रकाश पागे, शैलेश पगारिया, माजी संमेलनाध्यक्ष रवींद्र शोभणे, संजय नहार, ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर आणि साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले असंख्य रसिक आवर्जून उपस्थित होते.
यावेळी साहित्य संमेलनातील काही साहित्यिकांना तसेच आयोजन समितीतील मान्यवरांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले.
यावेळी बोलताना, अडीच हजार वर्षांचा इतिहास असलेल्या 50 हुन अधिक बोलीभाषांनी समृद्ध असलेल्या आणि ‘जो जे वांछिल तो ते लाहो’ अशी वैश्विक भूमिका असलेल्या माय मराठीला मी नमन करतो असे सांगितले. दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा.. असे आपण कायम म्हणतो मात्र हेच वाक्य दिल्लीत उभे राहून म्हणताना छाती अभिमानाने फुलून येते. याच तालकटोरा स्टेडियमच्या जागेवर 1737 साली मराठ्यांची छावणी पडली होती. महाप्रतापी मराठा सरदारांनी त्यावेळी तलवारीच्या बळावर दिल्लीचे तख्त राखले होते.
आज एवढ्या वर्षांनी मराठी साहित्यिकांची छावणी इथेच पडली असून तलवारीने नाही तर सारस्वतांच्या विचारमंचाने लोकांची मने जिंकली आहेत. गेले तीन दिवस दिल्लीत सुरू असलेल्या मराठी भाषेच्या अभूतपूर्व सोहळ्याचा समारोप आज होतो आहे. यानिमित्ताने मला उपस्थित राहण्याची संधी मिळाली हा माझ्यासाठी मोठा भाग्याचा क्षण असल्याचे शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
अनेक कारणांसाठी हे सम्मेलन समरणात राहील 70 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर हे सम्मेलन दिल्ली येथे पार पडत आहे. हे 98 वे साहित्य सम्मेलन असले तरीही अभिजात मराठी भाषेचे ते पहिलेच संमेलन आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद मोदी यांचे मनापासून आभार मानतो. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी आपण या भाषेचा अडीच हजार वर्षांचा इतिहास दाखवून दिला आणि आता आपल्यावर नवा इतिहास घडवण्याची जबाबदारी असल्याचे मत व्यक्त केले.
माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात मी ‘जय जय महाराष्ट्र माझा’.. या गीताला राज्य गीताचा दर्जा दिला. आज सर्व शाळा आणि शासकीय कार्यालयातील प्रत्येक कार्यक्रमात राष्ट्रगीतासोबत हे राज्यगीत अभिमानाने गायले जाते. माझ्याच मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला हे माझ्यासाठी फार अभिमानास्पद असल्याचे सांगितले. या कार्यात माझाही खारीचा वाटा होता याचाही मला सार्थ अभिमान आहे. यापुढे देखील मराठीच्या विकासासाठी असेच काम करत राहू असा विश्वास यावेळी बोलताना शिंदे यांनी व्यक्त केला.
संजय नहार यांच्या ‘सरहद्द’ या संस्थेने जम्मू आणि काश्मीरममध्ये केलेले काम हे खरोखरच हिमालयासारखे उत्तुंग आहे. मी स्वतः पुलवामा येथे त्यांनी आयोजित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उद्घाटनासाठी गेलो होतो या पुतळ्याची तलवार पाकिस्तानच्या दिशेने रोखलेली आहे. त्यानंतर त्यांनी महादजी शिंदे यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार मला देण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याहस्ते तो पुरस्कार मला प्रदान करण्यात आला. माझ्यासाठी हा पुरस्कार फार मोठा होता, मात्र हा पुरस्कार दिल्यामुळे संजयजीना नाहक त्रास सहन करावा लागला. या गोष्टीचा त्रास करून घेणारे माझा कायम तिरस्कारच करत आलेत त्यामुळे त्यांचा तिरस्कार आता मला पुरस्कारच वाटतो अशा शब्दांत त्यांचा समाचार घेतला.
साहित्य संमेलनाच्या निमित्ताने विज्ञान भवनात पार पडलेला सोहळा आपण पहिला. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार साहेबांचे सौहार्दाचे संबंध देखील आपण पाहिले. राजकारण निवडणुकीपूरते असते त्यानंतर संबंध कायम असतात आणि हाच महाराष्ट्र धर्म असल्याचे सांगितले. निवडणूका झाल्यावर राजकारणा पलिकडची नाती आम्ही जपत असतो आणि हेच आपल्याला टिकवायचे असल्याचे मत व्यक्त केले.
मी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा कट्टर शिवसैनिक आहे, तसाच मी कडवट मराठीभाषाप्रेमी आहे. मी लेखक, साहित्यिक किंवा विचारवंत देखील नाही, मी एक कार्यकर्ता आहे, काल आज आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार..ही भाषा माझ्या आईची आहे, ही ज्ञानेश्वर माऊलींची आहे, ही छत्रपती शिवाजी महाराजांचीही आहे, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, बहिणाबाईंच्या ओव्यांची भाषा आहे, ही लोकमान्य टिळकांची भाषा आहे, ही संविधान लिहिणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचीही भाषा आहे. महाराष्ट्र ही वीरांची भूमी आहे संतांनी येथे भक्ती संप्रदाय निर्माण केला, पराक्रमी वीरांनी शक्तीसंप्रदाय निर्माण केला. मराठी भाषा वात्सल्याची, मायेची भाषा आहे प्रसंग आला तर ती तलवारीची भाषाही बनते. तिच्यात सौंदर्य आहे, संतवाणी आहे, कौतुक करताना ती थकत नाही सेवा करताना अडखळत नाही असे गौरवोद्गार मराठी भाषेबद्दल काढले.
पंतप्रधान मोदींनी भाषणात दुसऱ्या भाषेचा द्वेष करून कोणीतीही भाषा वाढत नाही असे सांगितले, त्यामुळे जे जे मराठी आहे ते आपण वाढवले पाहिजे त्याचा सन्मान करायला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.
संमेलनाच्या अध्यक्षा ताराबाई भवाळकर यांनी आपल्या रोखठोक शैलीत आपल्याला काही गोष्टी सांगितल्या तर कान धरून काही बदल करायला सांगितले. या संमेलनातील चर्चासत्रात शासनाकडून अनेक गोष्टींची मागणी केली गेली. काही चांगल्या सूचना असतील तर नक्की सांगा शासन म्हणून आपल्या धोरणात ते बदल नक्की केले जातील असेही यावेळी बोलताना स्पष्ट केले. शासन म्हणून शासकीय कार्यालयात मराठी भाषेचा वापर करायला आम्ही सुरुवात केली आहे, मात्र सार्वजनिक वापरात मराठी भाषेचा वापर कमी प्रमाणात केला जात आहे त्यात बदल करण्याचे आवाहन सर्वांना केले.
मराठी भाषेचा डंका दिल्लीप्रमाणे येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात देखील वाजू लागणार आहे. मराठी भाषेचे अध्यसन केंद्र इथे तयार करण्यात आले आहे. तसेच आम्ही जागा देऊ तुम्ही शिवसृष्टी उभारा अशीही मागणी पुढे आली असल्याचे सांगितले. शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याचा अभ्यासक्रम देखील लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे सामंत यांनी सांगितल्याचे ते म्हणाले. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी अमरावती येथील रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन केले जाणार असल्याचे यावेळी शिंदे यांनी स्पष्ट केले. मराठी भाषेतील श्रेष्ठ साहित्यिकांच्या साहित्याची प्रदर्शने प्रत्येक जिल्ह्यात व्हायला हवीत अशी सूचना मराठी भाषा मंत्री उदय सामंत याना केली.
मराठी भाषेचा विस्तार व्हावा ती सर्वदूर पोहचावी यासाठी सर्वांनी तिचे जतन आणि संवर्धन करायला हवे असे मत व्यक्त केले. नाशिक येथील भीमाबाई जोंधळे यांचे पुस्तकांचे हॉटेल ही संकल्पना राबवली असल्याचे सांगितले, ‘पुनश्च’ च्या माध्यमातून जुन्या मासिकातील लेख पुन्हा ऑनलाइन प्रकाशित केले जातात, दर महिन्याला त्यात दोन नव्या लेखांची भर पडते नाशिक जिल्ह्यातील हिवाळी गावात जिल्हा परिषद शाळेत मराठी भाषेचा प्रसारासाठी केलेले कार्य यावेळी सांगितले आशी उदाहरणे शोधून आपण त्याना प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त केले. तसेच मराठीची नुसती बोलू कौतुके न म्हणता तीचा वापर जास्तीत जास्त करावा अशीही अपेक्षा यावेळी शिंदे यांनी व्यक्त केली.
नवी दिल्लीत आयोजित केलेल्या या संमेलनाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल साहित्य मंडळ आणि आयोजन समितीतील सर्व सदस्यांचे मनापासून आभार मानले. तसेच 98 वे साहित्य सम्मेलन यशस्वी केल्यानंतर 100 व्या साहित्य सम्मेलनाची तयारी आतापासूनच सुरू करावी अशी अपेक्षा शिंदे यांनी व्यक्त केली.
https://www.instagram.com/reel/DFHv4rcoAbG/?igsh=MWtrM3JxNjJ6N2U5dw==






