

पी.वी.आनंदपद्मनाभन
मुंबई
: महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने ग्रामीण कारागीर व उद्योजकांनी तयार केलेल्या उत्पादनांना शहरी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी विलेपार्ले येथे “उत्तुंग महाखादी प्रदर्शन” आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन दि. १८ ते २३ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत महालक्ष्मी नारायण हॉल लॉन्स, सुभाष रोड, विलेपार्ले (पूर्व) येथे होणार असून, दररोज सकाळी १०.०० ते रात्री ८.०० वाजेपर्यंत नागरिकांना भेट देता येणार आहे, अशी माहिती मंडळाचे सभापती रवींद्र साठे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गीतांजली बावीस्कर यांनी आज पत्रकार परिषदेतून दिली.
या प्रदर्शनात खादी वस्त्र, खादी साड्या, शुद्ध सेंद्रिय “मधुबन” मध, हळद, मसाले, कोल्हापूरी चप्पल, गूळ तसेच इतर ग्रामोद्योगी उत्पादने यांसारख्या वस्तूंचे ५० स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. खादीच्या स्वदेशी वस्त्रांबरोबरच आरोग्यासाठी लाभदायक सेंद्रिय उत्पादने आणि ग्रामीण भागातील कारागिरांच्या हातांनी साकारलेली दर्जेदार उत्पादने ग्राहकांना उपलब्ध होतील.
ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी खादी व ग्रामोद्योग मंडळ गेल्या ६५ वर्षांपासून अविरतपणे कार्यरत आहे. राज्य शासनाच्या उद्योग विभागांतर्गत खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या विविध योजना राबवल्या जातात. पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, मधकेंद्र (मधमाशापालन), मधाचे गाव तसेच प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना अशा अनेक उपक्रमांद्वारे ग्रामीण कारागीर आणि उद्योजकांना आर्थिक मदत आणि व्यवसायवृद्धीसाठी संधी दिली जाते.
ग्रामीण संस्कृती आणि पारंपरिक उत्पादने अनुभवण्याची तसेच स्वदेशी खादी आणि ग्रामोद्योगी वस्तूंची खरेदी करण्याची सुवर्णसंधी या प्रदर्शनात मिळणार आहे. या प्रदर्शनास अधिकाधिक मुंबईकर नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग सभापती श्री.साठे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती बाविस्कार यांनी मंडळाच्या वतीने केले आहे.
https://www.instagram.com/reel/DFHv4rcoAbG/?igsh=MWtrM3JxNjJ6N2U5dw==






