


पी.वी.आनंदपद्मनाभन
मुंबई,
महाराष्ट्र आणि ब्राझीलच्या गोयास राज्यात अनेक बाबींमध्ये साम्य आहे. महाराष्ट्र सर्वच क्षेत्रात देशात आघाडीवर असून महाराष्ट्राप्रमाणेच गोयास मध्ये देखील तंत्रज्ञान आणि नाविन्यतेवर भर दिला जातो. यामुळेच महाराष्ट्र आणि गोयास सोबत येऊन विकासाकडे वाटचालीची नवी सुरुवात करूया, असे आवाहन राजशिष्टाचार आणि पणन मंत्री जयकुमार रावल यांनी गोयासच्या शिष्टमंडळास केले.
ब्राझीलच्या गोयास राज्याचे गव्हर्नर ई. रोनाल्डो रामोस काईडो यांच्या नेतृत्वाखालील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या शिष्टमंडळाने राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांची मंगळवारी सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेतली. यावेळी विविध विकासात्मक बाबींवर चर्चा करण्यात आली.
मंत्री रावल म्हणाले भारत आणि त्यातही महाराष्ट्र सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहे. यामुळे जग भारताकडे आश्वासकतेने पाहत आहेत. महाराष्ट्रात विविध उद्योगांबरोबरच कृषी क्षेत्राच्या विकासावर विशेष भर देण्यात येत आहे. राज्यातील अनेक शेतकरी ऑरगॅनिक शेतीकडे वळत आहेत. ब्राझील प्रमाणेच साखर उत्पादनामध्ये देखील महाराष्ट्र अग्रेसर असून राज्यात इथेनॉल तयार करण्यावर भर दिला जात आहे. येथील आंबा, केळी, डाळिंब आदी फळे मोठ्या प्रमाणावर निर्यात होत असून येथे प्रक्रिया उद्योगात गुंतवणुकीसाठी देखील मोठा वाव आहे. महाराष्ट्र आणि गोयास राज्यामध्ये माहिती, तंत्रज्ञान, बाजारपेठ अशा विविध क्षेत्रात आदान प्रदान होऊन द्विपक्षीय परस्पर सहकार्य वाढवण्यासाठी प्रयत्न करता येतील. यासाठी सामंजस्य करार करून परस्पर सहकार्याची क्षेत्रे निश्चित करू, असे श्री. रावल यांनी सांगितले.
गोयास चे गव्हर्नर श्री.काईडो यांनी गोयास आणि महाराष्ट्रादरम्यान असलेल्या विविध क्षेत्रातील साम्यावर भाष्य करून ऑरगॅनिक शेती ही काळाची गरज असल्याचे सांगितले. साखर उद्योग, इथेनॉल उत्पादन आदींसह विविध क्षेत्रात सहकार्यासाठी सामंजस्य करार करण्यास त्यांनी सकारात्मकता दर्शविली.
https://www.instagram.com/reel/DFHv4rcoAbG/?igsh=MWtrM3JxNjJ6N2U5dw==







